आरोग्यासंबंधी असलेल्या फायद्यांमुळे मधाचे महत्त्व फार पूर्वीपासून जपले गेले आहे. औषधांपासून सौंदर्य प्रसाधनांपर्यंत कितीतरी गोष्टींमध्ये मध वापरला जातो. मधामध्ये अँटिऑक्सिडंट्स (ऑक्सिडंट ताणविरोधि) तर असतातच पण तो साखरेस पूरक व अँटीफंगल (बुरशीविरोधी ) म्हणूनही उपयोगात आणला जातो. मधाची रचना, रंग व चव हे मधमाशीने कोणत्या फुलातील अमृत शोषलं आहे यावर अवलंबून असते. त्यामुळे मध वेगवेगळ्या रंगात जसे कि पांढरट, बरगंडी, गडद तपकिरी किंवा सोनेरी रंगात सुद्धा असतो. तसेच त्याची चव फुलांच्या स्रोतावरून ठरते, उदाहरणार्थ गोड, आंबट, किंवा कडू इत्यादी!
संशोधनातून आत्तापर्यंत मधाचे २०० वेगळे प्रकार शोधले गेले आहेत. प्रत्येक मधाचे स्वतःचे अद्वितीय असे गुण आहेत. या गुणांनुसार त्यांचा वापर जखम भरण्यापासून कॅन्सरच्या उपचारापर्यंत केला जातो. या विविधतेने श्रीमंत असलेल्या जगात ज्या नैसर्गिक वातावरणात मध तयार झाले आहे त्यावर त्याचा पोत ठरतो. मध हा साधारणतः चिकट द्रव्य असून त्यात ग्लुकोज व फ्रुक्टोज भरपूर म्हणजेच ८०-८५% प्रमाणात असते. तसेच पाणी (१५-१७%), रक्षा (०.२%), प्रोटेइन्स (प्रथिने) आणि ऍमिनो ऍसिड (०.१ -०.४%) तर इतर पाचक द्रव्ये (enzymes) व व्हिटॅमिन्स मधामध्ये आढळून येतात.
पण, रासायनिक उद्योगांच्या उत्क्रांतीबरोबरच आजकाल नैसर्गिक पदार्थांची भेसळ हि वाढत चालली आहे. त्यामुळे बाजारात अनेक भेसळयुक्त पदार्थ उपलब्ध आहेत, त्यात सेंद्रिय मध मिळणे हि कठीण झाले आहे. शरीरावर होणारे नकळत पण दुष्परिणाम टाळण्यासाठी शुद्ध आणि ज्यामध्ये काहीच मिश्रित पदार्थ घातला नाही असे मध ग्रहण करणे गरजेचे आहे.
निशिथा वसंत आणि प्रियांशी माणी या दोघी २०१५ साली कोडाईकनाल मध्ये त्यांच्या माहितीपटाच्या एका प्रकल्पानिमित्त गेल्या होत्या. तिथे त्यांनी पुरातन काळापासून चालत असलेल्या आणि त्या तितक्याच पवित्र्याने जपलेल्या काही चालीरीती आणि तिथल्या निसर्गाची संपन्नता जाणून घेतली. त्यांचं लक्ष वेधून घेतलं ते आदिवासींच्या समुदायांनी आणि त्यांनी वापरलेल्या त्यांच्या मध काढण्याच्या पारंपरिक पद्धतीने. या पद्धतीने मध काढताना ते मधमाश्याना धक्का पोहचवत नाहीत.
सेंद्रिय मधाची गरज, उपयुक्तता आणि आदिवासी लोकांना जगाच्या बाजारात चांगला हमीभाव मिळवून देणे या उद्देशाने या दोघीनी मधाचा व्यवसाय सुरू केला. अश्याप्रकारे एकीकडे लोकांना पश्चिम घाटातील शुद्ध मध तर दुसरीकडे आदिवासी लोकांना त्यांचे हक्काचे व त्यांच्या कष्टाना योग्य पात्रतेचे पैसे मिळू लागले. सुरवातीला जरी थोडे कठीण असले तरी आदिवासी लोकांना विश्वासात घेऊन आणि आदिवासी बायकांना तिथेच मधाचे चांगले काम मिळवून दिल्यामुळे हळूहळू त्यांचा व्यवसाय जगभरात पसरत आहे. त्यांच्या स्टार्टअप चे नाव त्यांनी हुपोई ऑन ए हिल (टेकडीवर हुपोई पक्षी) असे ठेवले आहे. या नावामागचे रहस्य म्हणजे हा पक्षी दरवर्षी स्थलांतरावेळी पालानी टेकडीला भेट देतो.
वेगवेगळ्या ऋतूनुसार तयार होणारे मध, उदाहरणार्थ बहू पुष्प (multi- floral), कडू- जामून (bitter-jamun), निलगिरी (eucalyptus), वाइल्ड सिराना आणि कुरिंझी, गोळा केले जाते. हे मध आदिवासी लोक मोठ्या डब्यांमध्ये (can) भरून आणतात. हेच मध नंतर नैसर्गिक पद्धतीने गाळून काचेच्या बाटल्यांमध्ये भरले जाते. या स्टार्टअप ची अजून एक खासियत म्हणजे यांनी आपला व्यवहार व ऑर्डरची पूर्तता हा तिथे असलेल्या सरकारी पोस्ट तर्फेच चालू ठेवला आहे ज्यामुळे ते पोस्ट-ऑफिस बंद पडणार नाही.
या महिलांनी त्यांचं काम इथेच न थांबवता या व्यवसायातून दुय्यम असा व्यवसाय हि शोधला आहे जो त्यांच्या निर्माण होणाऱ्या कचऱ्याला कमी करतो. मध काढून राहिलेल्या पोळ्याचे ते रंगीत खडू (crayons), वस्तू लपेटणासाठीचे रुमाल (wraps), मेणबत्त्या बनवतात. त्यांच्या या छोट्याश्या भरारीनेसुद्धा कोडाईकनालच्या आदिवासी लोकांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली असे म्हणण्यास हरकत नाही. त्यांनी जगाला निसर्गाजवळ तर निसर्गाला जगातील कितीतरी लोकांसोबत जोडण्याची अत्यंत महत्वाची मोहीमच हाथी घेतलीय असे म्हटले तरी काही वावगे वाटणार नाही.


No comments:
Post a Comment